Pimpri

जात पडताळणी प्रमाणपत्र  सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ; नगरसेवक गायकवाड, बोईनवाड, पवार, घोलप यांना दिलासा

By PCB Author

September 18, 2018

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना जात पडताळणी प्रमाणपत्र   सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली  आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा मिळाला  आहे. त्याचबरोबर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमदेवारांनादेखील याचा फायदा मिळणार आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर कुंदन गायकवाड हे चिखली प्रभागातील राखीव जागेवरुन निवडून आले आहेत. तर, भोसरी धावडेवस्ती, प्रभागातून राखीव जागेवरुन नगरसेविका यशोदा बोईनवाड निवडून आल्या होत्या. मात्र, या दोन्ही नगरसेवकांनी अद्यापही जातप्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तर शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगर प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका मनीषा पवार आणि यमुनाननगर प्रभागातून आरक्षित जागेवरुन निवडून आलेल्या कमल घोलप यांनी जात प्रमाणपत्र सहा महिन्याची विहित मुदत संपल्यानंतर सादर केले होते. त्यामुळे मुदतवाढ दिल्यामुळे त्यांच्या पदाला कोणताही धोका नाही.