Pune

जात पंचायतीविरूद्ध तक्रार केली म्हणून महिलेला मारहाण

By PCB Author

July 21, 2021

पुणे, दि. २१ (पीसीबी) : भातू समाजाच्या जात पंचायतीतून बहिष्कृत करून व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी महिलेने 11 जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. संबंधित तक्रारीतून एकाने नाव वगळण्यासाठी तक्रारदार महिलेला साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना धनकवडीत नुकतीच घडली.

रूपेश प्रेम कुंभार (वय 40), निखील सुनील कुंभार (वय 29), प्रेम कुभार (वय 60) , रूबीना सुनील कुंभार (वय 45), प्रीती रूपेश कुंभार (वय 37) , पिंकी निखील कुंभार (वय 36 सर्व रा. मोहननगर, धनकवडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुहानी विकास कुंभार यांनी सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवडमधील गराडे गावात नोव्हेंबर 2020 मध्ये भातू समाजाची बैठक झाली होती. संबंधित बैठकीत 11 पंचानी सुहानी कुंभार यांच्या परिवाराला एक वर्षासाठी बहिष्कृत करून बैठकीचा व्हिडिओ व्हायरल केला होता. याप्रकरणी सुहानी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर 17 जुलैला सुहानी आणि त्यांची मुलगी मोहननगरमधील आईला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या आईच्या घरासमोर राहणाऱ्या प्रीती कुंभार, रूबीना कुंभार, पिंकी कुंभार यांनी सुहानी यांना जातपंचायत तक्रारीत रूपेश कुंभार यांचे नाव का टाकले. तक्रारीतून रूपेशचे नाव काढून टाक, असे म्हणत तिघीनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनी सुहानी कुंभार यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.