Desh

जाणून घ्या मोदींच्या मंत्रिमंडळात आता एकूण किती वकील, डॉक्टर, इंजिनिअर आणि सनदी अधिकारी असणार?

By PCB Author

July 07, 2021

नवी दिल्ली, दि.०७ (पीसीबी) : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने सध्या सर्वांच लक्ष दिल्लीकडे असून संध्याकाळी एकूण ४३ सदस्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जाती, जमातीच्या नेत्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जातीमधून १२ सदस्य असतील. यामधील दोन कॅबिनेटमध्ये असतील. तर आठ सदस्य अनुसूचित जमातीमधून असतील. यामधील तिघे कॅबिनेटमध्ये असतील.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मोदी सरकारमध्ये ओबीसीमधील एकूण २७ मंत्री असतील ज्यामधील पाच कॅबिनेटमध्ये असतील. याशिवाय कॅबिनेटमध्ये उच्चशिक्षित नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे. विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात एकूण १३ वकील, सहा डॉक्टर, पाच इंजिनिअर आणि सात सनदी अधिकारी असतील अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान नव्या मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्याचा जास्त प्रयत्न आहे. यामुळे ५० पेक्षा कमी वय असणाऱ्या १४ नेत्यांना संधी देण्यात येणार असून यापैकी सहा मंत्रिमंडळात असतील. याशिवाय प्रशासकीय अनुभवासाठी ३९ माजी आमदार आणि चार माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा भाग असतील.

याशिवाय अल्पसंख्यांक समाजातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात समावून घेतलं जाणार आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि शीख समाजातील प्रत्येकी एक आणि बौद्ध समाजातील दोन नेत्यांना संधी मिळणार आहे. तसंच ईशान्य भारतातील पाच मंत्री असतील अशी माहिती मिळत आहे.