Maharashtra

जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला – शरद पवार

By PCB Author

January 15, 2020

महाराष्ट्र,दि.१५(पीसीबी) – “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा असं कुठेही संबोधण्यात आलेलं नाही. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे,” असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर भाजपा नेते आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे असं यावेळी ते म्हणाले. खटाव- माण साखर कारखान्याच्या २५१००१ व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला असताना यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा जाणता राजा असा होणारा उल्लेखही आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या आधी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याच मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती.