Pimpri

जागेवर जबरदस्तीने ताबा घेऊन मूळ मालकाकडे 40 लाखांच्या खंडणीची मागणी

By PCB Author

October 23, 2020

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – जागेवर जबरदस्तीने ताबा घेण्यासाठी जाऊन मूळ मालकाला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करत जागेत पुन्हा येण्यासाठी 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना माण येथे 1 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानोबा नथु ढवळे, संभाजी नथु ढवळे, शुभम ज्ञानोबा ढवळे (सर्व रा. ढवळे वस्ती, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके (वय 51, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 22) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोडके यांची माण येथे 13.5 गुंठे जागा आहे. 1 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत आरोपी आरोपी फिर्यादी यांच्या जागेत जबरदस्तीने ताबा घेण्यासाठी गेले. फिर्यादी यांना वेळोवेळी दमदाटी शिवीगाळ केली. ‘त्या मिळकतीवर पुन्हा पाय ठेवायचे असतील तर त्या बदल्यात 40 लाख रुपये द्यावे लागतील’ असे म्हणत खंडणीची मागणी केली.

फिर्यादी यांनी पैसे न दिल्यास त्यांना हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.