जागितक कुस्ती – दिग्गज्जांच्या गैरहजेरीत नवोदितांपुढे कडवे आव्हान

0
443

ओस्लो (नॉर्वे), दि.०२ (पीसीबी) : अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीमुळे जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय नवोदित मल्लांसमोर कडवे आव्हान उभे राहणार आहे. महिला विभागात अगदी अंशु मलिकच्या कामगिरीकडेही सर्वांचा नजरा लागून राहतील. या स्पर्धेला उद्यापासून सुरवात होत आहे. ऑलिंपियन आणि अनुभवी बजरंग पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट आणि दीपक पुनिया या स्पर्धेत खेळणार नाहीत. यापैकी कुणाचा सराव नाही, तर कुणी तंदुरुस्त नाही. यांच्या गैरहजेरीत रविंदर दहिया (६१ किलो), रोहित (६५ किलो), यश तुशिर (७४ किलो), पृथ्वीराज पाटिल (९२ किलो) आणि अनिरुद्ध गुलिया (१२५ किलो) यांच्या कौशल्याची कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मल्ल वरिष्ठ पातळीवर प्रथमच खेळत आहेत.

भारताला सर्वाधिक आशा महिला गटात ५७ किलो गटात अंशु मलिक हिच्याकडून राहतील. भारतीय संघातील ही एकमेव खेळाडू अशी आहे की जी टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळली आहे. गेल्या काी स्पर्धेत तिने या वजनी गटात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या वेळी ती पदक मिळवेल अशी खात्री बाळगली जात आहे.

अंशुनंतर भारताच्या अपेक्षा आणि नजरा सविता मोर हिच्या कामगिरीवर अवलंबून असतील. अनुभवाच्या आघाडीवर भारतीय संघातील ही सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तंत्र आणि शारीरिक क्षमता अशा दोन्ही आघाड्यांवर ती चांगली सरावलेली आहे. विशेष म्हणजे ती मानसिकदृष्ट्य अधिक कणखर आहे. आशियाई पातळीवर तिने अनेक पदके मिळविली आहेत. पण, जागतिक स्तरावरील स्पर्धा येते तेव्हा ती कायम अपयशी ठरली आहे. वरिष्ठ गटात पाच आणि २३ वर्षांखालील एक अशा सहा जागितक स्पर्धांचा तिला अनुभव आहे. पण, एकदाही ती विजयमंचापर्यंत पोचू शकलेली नाही. महिला गटात संगीता फोगट हिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे ती दुखापतीनंतर चार वर्षांनी प्रथमच मॅटवर उतरणार आहे. दुसरे कारण म्हणजे ऑलिंपियन बजरंग पुनियाची ती बायको आहे. त्यामुळे तिच्या सहभागाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. ऑलिंपिकची संधी हुकलेली दिव्या कांक्रन आपली योग्यता सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. रितु मलिक, हनी, पूजा जाट आणि भातेरी या अन्य खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावतील.

पुरुष विभागात केवळ सत्यव्रत कडियान (९७ किलो) वगळता सर्व नवोदित मल्ल आहेत. यातही ५७ किलो गटात शुभमला चांगली संधी होती. पण, तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे.