Desh

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी; नोझोमी ओकुहाराचा पराभव  

By PCB Author

August 25, 2019

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने विजेत्या पदावर आपले नांव कोरले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत केले.  या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणारी सिंधू पहिली भारतीय ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने चौथ्या क्रमांकाच्या नोजोमी ओकुहाराला २१-७ आणि २१-७ अशा सेटमध्ये मात दिली. हा सामना ३७ मिनिटे चालला. या विजयासोबतच सिंधूने ओकुहाराविरुद्धचे तिचे कारकिर्दीताल विक्रम  ९-७ असा केला आहे.

या स्पर्धेच्या  अंतिम फेरीत सिंधूने तिसऱ्यांदा धडक मारली होती.  तसेच  यापूर्वी दोन रौप्य आणि दोन ब्राँझ पदके पटकावली  आहेत. २०१७ आणि २०१८ साली  सिंधूला रौप्य आणि २०१३ आणि २०१४ साली सिंधूला ब्राँझ पदक मिळाले होते.

सुरुवातीलाच सिंधूने ५-१ने आघाडी घेतली. यानंतर तिची आघाडी १२-२पर्यंत पोहोचली.  १६-२ने आघाडी घेतल्यानंतर सिंधूने २१-७ असा पहिला गेम जिंकला. सिंधूने १६व्या मिनिटाला पहिला गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने २-०ने आघाडी घेतली. यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये तिने ८-२ची आघाडी कायम ठेवली. अखेर सिंधूने दुसरा गेमही २१-७ ने  मिळवत विजय संपादन केला.