जागतिक टेबल टेनिस – मनिका महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

0
415

ह्युस्टन, दि.२७ (पीसीबी) : भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हिने जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीसह मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. तिच्या या कामगिरीमुळे आता भारत जागतिक स्पर्धेतील पहिल्या वहिल्या पदकापासून एक विजय दूर आहे.

मनिका आणि अर्चना कामथ जोडीने हंगेरीच्या डोरा मॅडराझ आणि जॉर्जिना पोटा जोडीचा ११-४, ११-९, ६-११, ११-७ असा पराभव केला. त्यांची गाठ आता लुक्झेम्बर्गच्या सारा डी नट्टे आणि झिया लिआन नी जोडीशी पडणार आहे. उपांत्य फेरीत हरणाऱ्या जोडीस ब्रॉंझपदक देण्यात येते. त्यामुळे आता भारतीय जोडीसला किमान ब्रॉंझपदकाची कमाई करण्यासाठी एक लढत जिंकावी लागेल.

मिश्र दुहेरीत मनिका बात्राने जी. साथियनच्या साथीने कनक झा आणि वॅंग मन्यु या अमेरिकन-चिनी जोडीचा १५-१७, १०-१२, १२-१०, ११-६, ११-७ असा पराभव केला. त्यांची गाठ आता जपानच्या हारीमोटो टोमाकाझु-हयाता हिना जोडीशी पडणार आहे.

मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचणारी मनिका-साथियन ही भारताची केवळ दुसरीच जोडी ठरली. यापूर्वी १९५२ रणधीर भंडारी आणि सय्यद सुलताना यांनी अशी कामगिरी केली होती. त्याचबरोबर भारताची एकच खेळाडू एकाच जागतिक स्पर्धेत दोन गटात उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. मनिकाने महिला दुहेरीतही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मनिकाने यापूर्वी २०१७ मध्ये मौमा दासच्या साथीतही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

एका बलाढ्य जोडीविरुद्ध पिछाडी भरून काढत मिळिवलेला विजय खूप मोठा आहे. आमची जोडी चांगली जमली आहे. आमच्यातील समन्वय खूप सुरेख आहे. हे सातत्य पुढेही राखून ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जपानच्या अव्वल जोडीविरुद्ध खेळण्याचे आव्हान आहेच, पण आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावू, असे जी. साथियन याने सांगितले.

मिश्र दुहेरीत शरथ अंचता कमाल आणि अर्चना कमाल जोडीला फ्रान्सच्या जिया नान युआन आणि इमॅन्युएल लेबेसन जोडीकडून पराभव पत्करावा लागला.