जळगांव महापालिकेत भाजपची सत्ता; सुरेश जैन यांचे संस्थांन खालसा   

0
716

जळगाव, दि. ३ (पीसीबी) – जळगाव महापालिकेवर गेली ३५ वर्षे निर्विवाद सत्ता असणाऱ्या माजी मंत्री सुरेश जैन धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीची आज (शुक्रवार) मतमोजणी झाली. एकूण ७५ पैकी भाजपने ५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. तर एमआयएमला ३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

सुरेश जैन यांच्या बालेकिल्ल्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खिंडार पाडले आहे. पालिकेवर  भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. महापालिकेच्या ७५ जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र, मुख्य लढत शिवसेना आणि भाजपमध्येच रंगली. सुरेश जैन विरोधात गिरीश महाजन अशी ही प्रतिष्ठेची लढत झाली. त्यामुळे जळगावमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, महाजन यांनी सर्व ताकद पणाला लावून महापालिकेवर भाजपवर झेंडा रोवण्यात यश मिळवले.

भाजपने ५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना १५ जागावर विजयी  झाली. तर एमआयएमला ३ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना भोपळाही फोडता आलेला नाही. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्या पत्नी लता सोनावणे या विजयी झाल्या आहेत.