जल्लोष करण्यापूर्वी नेमकं झालंय, काय? हे स्पष्ट करा – अजित पवार  

0
699

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात  सरकारमधील मंत्र्यांकडून विविध मते  व्यक्त केली  जात आहे. यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सांगत आहे की जल्लोष करा. मात्र, जल्लोष करण्यापूर्वी नेमकं झालंय, कसं झालंय हे त्यांनी स्पष्ट करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  अजित पवार यांनी म्हटले आहे.

विधानसभेत अजित पवार यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करुन मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात चर्चा घेण्याची  मागणी आज (गुरूवार)  केली.  यावेळी ते  म्हणाले, राज्य मागासवर्गाचा अहवाल सभागृहात पटलावर मांडावा. मंत्र्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे समाजात विशेषत: मराठा समाजात संभ्रमावस्था आहे. ओबीसी समाजातही भीतीचे वातावरण आहे, आमचा हिस्सा कोणाला दिला जातोय का, असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला आहे, असे ते म्हणाले.

धनगर समाजाच्या  अहवालासंदर्भात केंद्र सरकारकडे काय शिफारस करणार आहेत, मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यास परवानगी दिली होती, त्याचे काय झाले, या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, अशी मागणी त्यांनी  केली. आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन  राज्यात  संभ्रम आहेत. त्यामुळेच यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी  पवार यांनी यावेळी केली.