Pimpri

जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शुभहस्ते कामगारांचा सन्मान व संवाद

By PCB Author

July 22, 2021

असंघटित कामगारांना विविध लाभाचे वितरण

कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी दि.२२ (पीसीबी) : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवारी शहरात कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या चार घास सुखाचे या उपक्रमास आवर्जुन भेट देणार असुन कामगार संवादच्या निमित्ताने असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनांचे लाभ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येणार आहेत, महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने कोरोना काळात दररोज तीन हजारप्रमाणे आजतागायत सुमारे पावणे दोन लाख अन्नाच्या पाकिटाचे वितरण गरजुंना करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील असंघटित कामगारांना सर्वात जास्त योजनांचा लाभ देणारे कष्टकऱ्यांचे कामगारनेते म्हणुन काशिनाथ नखाते यांची ओळख आहे याचीच दखल राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवर घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व कष्टकरी कामगार महासंघाच्या माध्यमातून शहरातील बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक, फेरीवाला टपरी व पथारी यांच्यासह विविध घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी भरीव काम केले आहे याचीच दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील हे त्यांच्या संपर्क कार्यालयास आवर्जून भेट देणार असुन असंघटित कामगारांशी संवाद साधणार आहेत. कामगारांचे विविध प्रश्न व अडचणी जाणुन घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

थरमॅक्स चौक चिंचवड येथील रोटरी क्लब येथे “कामगार संवाद, असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ व कोरोना काळात भरीव काम केलेल्या कोरोना योध्दयांचा सन्मान” अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महागायक आनंद शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, मा.आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, प्रशांत शितोळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महासंघाच्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे .