जलवाहिनी, शुद्ध पाणीपुरवठ्यासंबंधी कामाची विभागणी करण्याचे स्थायीसमितीचे आदेश

0
281

पिंपरी, दि.०६ (पीसीबी) : पाणीपुरवठा प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याअंतर्गत वाकड, थेरगाव, भोसरीतील सेक्टर 7 आणि 10 मध्ये तसेच भोसरी परिसरात नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे, जलवाहिनी टाकणे तसेच शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंपिंग व्यवस्था कार्यान्वित करण्याच्या कामाला स्थायी समितीने खोडा घातला. एकाच ठेकेदाराला काम दिल्यास दिरंगाई होईल असे कारण देत त्याची विभागणी करण्याचा आदेश स्थायी समितीने दिला आणि 66 कोटी 91 लाख रुपयांचा प्रस्ताव बुधवारी दफ्तरी दाखल केला. जेएनएनयुआरएम अंतर्गत 40 टक्के भागासाठी 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम सुरू आहे. तसेच अमृत अभियानाअंतर्गत उर्वरीत 60 टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे या प्रकल्पाचे काम चार ठेकेदारांमार्फत चार वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत जीआय पाईपचे जुने नळजोड पाईप बदलणे, हायड्रोलीक डिझाईननुसार नवीन पाईपलाईन टाकणे, जुन्या पाईपलाईन बदलणे, आवश्यक ठिकाणी नवीन जलकुंभ उभारणे ही कामे करण्यात येत आहेत. यामुळे पाणीगळती कमी होऊन पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

पाणीपुरवठा प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याअंतर्गत वाकड, थेरगाव, भोसरीतील सेक्टर 7 आणि 10 मध्ये तसेच भोसरी परिसरात नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे, जलवाहिनी टाकणे तसेच शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंपिंग व्यवस्था कार्यान्वित करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने या कामासाठी निविदा मागवल्या. निविदा दर 64 कोटी 65 लाख 82 हजार रूपये निश्चित करण्यात आला. त्यानुसार तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये गुडविल कन्स्ट्रक्शन यांनी निविदादरापेक्षा 3.49 टक्के जादा दर सादर केला. म्हणजेच 66 कोटी 80 लाख 55 हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 2 लाख 32 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 8 लाख 23 हजार रूपये असे एकूण 66 कोटी 91 लाख 10 हजार रूपये खर्च होणार आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या कामांची निविदा स्विकारण्यास 23 मार्च रोजी मान्यता दिली. मात्र स्थायी समितीने गेली दीड महिने हा प्रस्ताव विषयपत्रिकेवर येऊ न देण्याची पुरेपुर काळजी घेतली. अखेर आजच्या विषयपत्रिकेवर हा महत्त्वपुर्ण प्रस्ताव दाखल करण्यात आला. मात्र, स्थायी समितीने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. एका मोठ्या ठेकदाराला कंत्राट दिल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने विलंब लावेल. काम रखडेल. त्याऐवजी मोठ्या कामाचे विभाजन केल्यास काम जलदगतीने संपेल. पाणीपुरवठ्याचा प्रकल्प लवकर मार्गी लागेल. त्यामुळे प्रस्ताव दफ्तरी दाखल केला आहे. अल्पमुदतीची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी सांगितले.