Maharashtra

जलयुक्त शिवार योजनेत पाण्याऐवजी पैसेच मुरले का – रोहित पवार

By PCB Author

October 15, 2020

मुंबई, दि. १५ पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार हा विषय आगामी काळात चांगलाच गाजणार असे दिसते.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर झालेल्या चर्चेनंतर योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाचं रोहित पवार यांनी ट्विट करत स्वागत केलं आहे. “जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. यापूर्वीही कॅगनच्या अहवालाचा हवाला देत रोहित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. “ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल ९६३३ कोटी रुपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल, तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.