जलतरण तलावाचे स्थापत्य व विद्युत विषयक कामे पूर्ण करा

0
345

– क्रिडा समितीची पाक्षिक सभा संपन्न

पिंपरी, दि. १ (पीसीबी) :- कोरोनामुळे बंद असलेले शहरातील जलतरण तलाव चालू करण्याचे आदेश क्रिडा सभापती प्रा उत्तम केंदळे यांनी आज (दि.२६) रोजी प्रशासनाला दिले.क्रिडा समितीची पाक्षिक सभा महानगरपालिकेतील कै मधुकर पवळे सभागृहात आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्रिडा समिती सदस्य रेखा दर्शीले, सदस्य शर्मिला बाबर, सदस्य राजु मिसाळ, सहाय्यक आयुक्त क्रीडा सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता क्रिडा स्थापत्य सुनील वाघुंडे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे व क्षेत्रीय कार्यालयाचे आठ क्रिडा पर्यवेक्षक व अधिकारी उपस्थित होते.

सामान्य नागरिक, खेळाडू यांच्यासाठी विविध स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धा आयोजनासाठी जलतरण तलावाची सुविधा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.कोरोनामुळे शहरातील बारा जलतरण तलाव बंद होते.त्यातील नेहरूनगर, संभाजीनगर, काटेपुरम पिंपळे गुरव व प्राधिकरण हे चार जलतरण तलाव चालू करण्यात यावेत. आठ जलतरण तलावाचे स्थापत्य व विद्युत विषयक कामे पूर्ण करून चालु करण्याच्या सूचना सभापती प्रा उत्तम केंदळे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

११ ते २२ डिसेंबर दरम्यान अकरावी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियन शिप स्पर्धा २०२१ मेजर ध्यानचंद हॉकी पोलिग्रास स्टेडियम येथे होणार आहे.१० ते १२ डिसेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १८ ते ४५ महिला पुरुष गट व ४५ वर्षावरील महिला पुरुष गट यांची स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे यावर चर्चा करण्यात आली