Desh

जम्मू-काश्मीर भारताचेच राज्य; ७२ वर्षानंतर पाकिस्तानची कबुली

By PCB Author

September 10, 2019

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – जम्मू-काश्मीरवरून  वल्गना करणारे  पाकिस्तान तोंडघशी पडले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री  शाह महमूद कुरैशी यांनी जम्मू-काश्मीर हे भारताचेच राज्य असल्याची कबुली   संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर दिली आहे.  तब्बल ७२ वर्षानंतर पाकिस्तानने ही कबुली दिली आहे.

जिनिव्हा येथे ७२ वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी) सुरू आहे. या परिषदेत  शाह महमूद कुरैशी  बोलत होते. जम्मू-काश्मीर भारताचे राज्य आहे, असे सांगून कुरैशी यांनी भारतावर टीकाही केली. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांचे उल्लंघन होत आहे, असे  खोटे आरोप करतानाच या परिषदेने काश्मीरमधील मानवाधिकाराकडे लक्ष द्यावे.  काश्मीरमध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही शाह यांनी केली.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, संस्था, एनजीओ यांना भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश का दिला जात नाही? जम्मू काश्मीरमध्ये  ७ ते १० लाख सैनिक तैनात असून जगातील सर्वात मोठा कैदखाना  आहे, अशी टीका कुरैशी यांनी केली आहे.  काश्मीरमध्ये ६ हजाराहून जास्त नेता, सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले असल्याचा आरोप  यावेळी त्यांनी केला.