जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा जवान शहीद

0
535

देश, दि.२३(पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा जवान शहीद झाला आहे. पुलवामाजवळ बंडजु या भागात भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत, बार्शी तालुक्यातील पानगावचे वीर सुनील काळे हे धारातीर्थी पडले. सुनील काळे हे केंद्रीय राखीव संरक्षण दलामध्ये कार्यरत होते.

भारतीय जवानांना जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजु या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती आज पहाटे मिळाली होती. यावेळी CRPFच्या एका तुकडीने बंडजु परिसराची पाहणी केली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरल्यानंतर, अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सुनील काळे हे शहीद झाले.

दुसरीकडे भारतीय जवानांनीही दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी जागच्या जागी ठार झाले. मात्र या चकमकीत महाराष्ट्राचा वीर शहीद झाल्याने राज्यावर शोककळा पसरली. शहीद जवान सुनील काळे हे मूळ बार्शी तालुक्यातील पानगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.