Desh

जम्मू-काश्मीरकडे निघालेले बीएसएफचे दहा जवान बेपत्ता

By PCB Author

June 28, 2018

मुघलसराय, दि. २८ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादवरून जम्मू-काश्मीरकडे निघालेले बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व जवान बीएसएफच्या ८३ व्या बटालियनमध्ये तैनात होते. हे सर्वजण आर्मीच्या स्पेशल ट्रेनमधून जम्मू-काश्मीरकडे निघाले असता वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्टेशनादरम्यान ते बेपत्ता झाले. उत्तर प्रदेशातील मुघलसराय रेल्वे स्थानकात ट्रेन पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी मुघलसरायच्या जीआरपी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

बीएसएफचे सुखबीर सिंह यांनीही जवान बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला पृष्टी दिली आहे. ‘हे जवान पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादवरून ८३ व्या बीएन बटालियनच्या बीएसएफ जवानांना घेऊन आर्मीच्या स्पेशल ट्रेनने जम्मूकडे निघाले होते. या दरम्यान ही ट्रेन वर्धमान आणि धनबाद स्टेशन दरम्यान थांबली होती. तिथूनच ते गायब झाले असावेत,’ असं सुखबीर सिंह यांनी सांगितलं. धनबाद स्टेशनवरून ट्रेन निघाल्यानंतर ट्रेनमधील जवानांची गणती करण्यात आली. तेव्हा हे दहा जवान गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी जवान हरवल्याची तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले.

वर्धमान रेल्वेस्थानकातून प्रदीप नावाचा जवान बेपत्ता झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिव सिंह, कैलाश कुमार, दीपक कुमार, दीपक सिंह, अमित कुमार, चवन सिंह, अश्वनी कुमार, रोहित वर्मा, गोविंद कुमार हे धनबादमधून बेपत्ता झाले असून या जवानांचा जीआरपी पोलिसांनी शोध सुरू केला आहे.