Pune

जमीन डेव्हलपमेंटसाठी देण्याच्या बहाण्याने अमर बिल्डर्सची तब्बल पाच कोटींची फसवणूक

By PCB Author

October 12, 2021

पुणे, दि.१२ (पीसीबी) : धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अखत्यारीतील एका ट्रस्टची जमीन डेव्हलपमेंटसाठी देण्याच्या बहाण्याने अमर बिल्डर्सची तब्बल पाच कोटी 33 लाख 31 हजार 537 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अ‍ॅड. पराग देशपांडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड. पराग देशपांडे (वय 38, रा. गोकुळ नगर, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे. या प्रकरणी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षिका सुनीता अंकुश तिकोने (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 पर्यंत पुण्यातील धर्मदाय सह आयुक्त कार्यालयात घडला.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देशपांडे यांनी चॅरिटी हेल्पलाइन या नावाची फर्म स्थापन केली. ही फर्म धर्मादाय सह आयुक्त कार्यालय यांची अधिकृत फर्म असल्याचे भासविले. अमर बिल्डर्स यांना ट्रस्टची ही जागा डेव्हलपमेंटसाठी हवी होती. या जागेचे ते विकसन करणार होते. 2011साली धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या जागेची किंमत तीन कोटी रुपये अशी निश्चित केली होती. त्यावेळी बिल्डर्सकडून ही रक्कम भरण्यात आली नाही. दरम्यान त्यांनी त्याकरिता मुदतवाढ घेतली.

आजमितीस या जागेची किंमत पाच कोटी 33 लाख 31 हजार 537 रुपये असल्याचे देशपांडे यांनी अमर बिल्डर्सला सांगितले.चॅरिटी हेल्पलाइन या फर्मच्या नावाने बनावट लेटरहेडवर पत्र सादर करून त्यांना वेळोवेळी ही रक्कम भरण्यास भाग पाडले. वास्तविक चॅरिटी हेल्पलाइन या शासकीय कार्यालयाच्या फलकावरील मजकूर वापरून धर्मादाय विभागाची देखील फसवणूक करण्यात आली आहे. पराग देशपांडे हा पेशाने वकील असून तो शिवाजी नगर न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो. अमर बिल्डर्सकडून पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.