जमिनीवर अतिक्रमण केल्याने नोटीस पाठवली म्हणून एकास मारहाण, जातीवाचक शिवीगाळ

0
317

चाकण, दि. २२ (पीसीबी) – एका व्यक्तीच्या जमिनीवर दोघांनी अतिक्रमण केले. याबाबत जमीन मालकाने रीतसर दोघांना नोटीस पाठवली. त्या कारणावरून अतिक्रमण केलेले दोघे आणि त्यांचे दोन साथीदारांनी मिळून जमीन मालकाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी निघोजे येथे घडली.

अनिकेत पंढरीनाथ येळवंडे (रा. मुटकेवाडी, चाकण), रामचंद्र किसन येळवंडे (रा. निघोजे), पिंटू रामचंद्र येळवंडे (रा. निघोजे), मनोज पंढरीनाथ येळवंडे (रा. मुटकेवाडी, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे निघोजे येथे गट नंबर 326 ही वडिलोपार्जित जमीन आहे. त्यातील 2.25 आर क्षेत्र अनिकेत येळवंडे यांना सन 2016 साली व 5.5 आर क्षेत्र रामचंद्र येळवंडे यांना सन 2012 साली विकले आहे. अनिकेत येळवंडे आणि रामचंद्र येळवंडे यांनी त्यांच्या जागेत बांधकाम न करता फिर्यादी यांच्या क्षेत्रात अतिक्रमण केले. याबाबत फिर्यादी यांनी वकिलामार्फत आरोपींना रीतसर नोटीस पाठवली.

फिर्यादी लॉन्ड्रीत काम करत असताना आरोपी आले. नोटीस पाठवल्याच्या कारणावरून फिर्यादी यांना मारहाण केली. ‘आता वाचलास परत सापडल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.