जमिनीच्या व्यवहारामध्ये सहभाग घेतल्याच्या आरोपावरुन गनमैन शैलेश जगतापसह गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

0
3522

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पोलिस दलातील नोकरीचा दुरुपयोग करुन जमीनीच्या व्यवहारामध्ये सहभाग घेतल्याच्या कारणावरुन मृत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांचा भाऊ “गनमैन” शैलेश हरीभाऊ जगताप आणि परवेज शब्बीर जमादार या दोघा पोलिस कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबतचा आदेश अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील यांनी काढला आहे. शैलेश जगताप यांची लष्कर पोलिस ठाण्यात तर परवेज जमादार यांची गुन्हे शाखेत नेमणूकीस होते.

अपर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी काढलेल्या आदेशामध्ये जगताप यांनी आपल्या कामाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाउन स्वत:च्या वैयक्तिक व आर्थिक फायद्यासाठी नीलमणी धैर्यशील देसाई यांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये सहभाग घेतला. त्याचबतोबर जगताप यांनी रोख रक्कम, दुचाकी गाडी,ब्रँडेड कपडे स्विकारल्याचे पोलिस प्रशासनाने केलेल्या अंतर्गत चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस कर्मचारी असुनही खोटी व वरिष्ठाची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचे आदेशात नमुद केले आहे. जगताप यांच्या बेशिस्त व बेजबाबदार वर्तनामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात स्पष्ठपणे नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान, शैलेश जगताप हे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांचे भाऊ आहेत. जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मानकर सध्या कारागृहात आहेत.  यामुळे सुडबुध्दिने आपले निलंबन झाले असल्याचे शैलेश जगताप यांचे म्हणने आहे.