Maharashtra

जमिनीच्या वादातून पत्नीसमोर तरुणावर कोयत्याने वार करुन खून

By PCB Author

November 12, 2018

भिवंडी, दि. १२ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून घरा शेजारी राहणाऱ्या इसमाने एका तरुणावर त्याच्या पत्नीसमोरच कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.११) भिवंडीतील गैबीनगर येथे घडली.

मोहम्मद आवेश सईद अहमद अन्सारी (वय ३२, शांतीनगर पिराणीपाडा, भिवंडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अफरोज अन्सारी या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घरी पाहुणे येणार असल्याने मोहम्मद आवेश पत्नीसह दुचाकीवर बाजारात निघाला होता. त्यावेळी शेजारी राहणारा अफरोज आणि त्याचे साथीदार रिक्षाने आवेशचा पाठलाग करत होते. काही अंतरावर पाठलाग करणाऱ्या रिक्षाने आवेशच्या बाईकला धडक दिली. धडकेनंतर आवेश आणि त्याची पत्नी कुलसुम उर्फ जोया खाली पडले. त्यावेळी अफरोज अन्सारी व त्याच्या साथीदारांनी आवेशच्या पत्नीसमोरच त्याच्यावर कोयत्याने सपासप ७ ते ८ वार केले. या हल्ल्यात आवेशचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणात घटनेची माहिती संपूर्ण परिसरात पसरली. त्यानंतर नागरिकांनी अफरोजच्या घरावर हल्ला करत घराचे मोठे नुकसान केले. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अफरोज अन्सारीला अटक केली आहे.