जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

0
257

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई पोलिसांनी ओटा स्किम निगडी येथे गुरुवारी (दि. 30) केली. सचिन प्रल्हाद अवघडे (वय 19, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मागील काही महिन्यांपासून फरार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहरातील टॉप 25 फरार, पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे आणि पोलीस शिपाई आशिष बनकर यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी चिकन चौक, ओटास्कीम येथे थांबला आहे.

त्यानुसार पोलिसांनी चिकन चौकात सापळा लावला. चिकन चौकात आरोपी सचिन हा कुणाचीतरी वाट पाहत थांबला होता. पोलिसांनी साडेसहाच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार दत्ता अर्जुन देवकर, जितु जाधव व प्रतिक येळकांडे यांच्यासोबत जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. सचिनला अटक करून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.