Pune

जन्मठेपेतील २० वर्षांपासून फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केले अटक

By PCB Author

August 22, 2018

पुणे, दि. २२ (पीसीबी) – परभणी जिल्ह्यात खून केल्याप्रकरणी हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आणि २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

रंगनाथ गणपतराव खरवडे (वय ५३, रा. कात्रज, मु.रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो १९९८ पासून फरार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खरवडे याने परभणी जिल्हायत १९९७ मध्ये खून केला होता. त्याला १९९८ मध्ये औरंगाबाद हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र पोलिसांच्या तावडीतून निशटून तो २० वर्षांपासून फरार होता. परभणी पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. भारती विद्यापीठ पोलिसांना एका खबऱ्याकडून खून प्रकरणातील गुन्हेगार कात्रज येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी खरवडे याला कात्रजमधून अटक केली. त्याच्या चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.