Pimpri

जनहो, स्वयंस्पुर्तीने जनता कर्फ्युचे पालन करा – महापौर माई ढोरे

By PCB Author

July 08, 2020

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनो विषाणूचा वाढता संसर्ग, त्याने आलेले हे अभूतपूर्व संकट पाहता ही कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत स्वत:हून जनता कर्फ्यू पत्करावा व घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

गेल्या चार महिन्यापासून महापालिकेतील व शहरातील डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातले कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महापालिका प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था कोरोना विरोधात लढा देवुन कोरोना हद्दपार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. हा लढा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने यामध्ये नागरिकांचा उत्स्पुर्त सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोरोना प्रसाराचे संपूर्ण जनतेपुढे आलेले हे गंभीर संकट दुर करण्यासाठी व त्याला आळा घालणेसाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी या जनता कर्फ्युमध्ये स्वत:हुन सहभाग घेतला पाहिजे.

शहरातील सर्व कारखानदार,खाजगी अस्थापना, घाऊक व किरकोळ मालाचे व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, भाजी मंडई चालक, मटन मांस विक्रेते यांना आवाहन करणेत येते की, खरेदीसाठी होणारी गर्दी टाळणेसाठी आपण दर गुरुवारी व रविवारी आपली दुकाने, अस्थापना जनता कर्फ्युचा उद्देश साध्य करण्यासाठी पूर्णवेळ बंद ठेवावीत आणि महापालिकेस सहकार्य करावे. शहरातील नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच ते करावे अन्यथा संपूर्ण दिवसभर घरीच रहावे. स्वत:ची काळजी घ्यावी व इतरांचीही घ्यावी, असे तुमच्याकडून मला सहकार्य हवे आहे, असेही आवाहन महापौर व सत्तारुढ पक्षनेते यांनी शहरातील जनतेला केले आहे.