Pune

जनतेतून निवडून येत चंद्रकांत पाटलांचे विरोधकांना प्रत्युत्तर

By PCB Author

October 24, 2019

पुणे, दि. २४ (पीसीबी) – कोथरुड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुमारे २६ हजारांचे मताधिक्य घेत  जनतेतून निवडून येऊन टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.  त्यांच्या विरोधातील  मनसेचे उमेदवार किशोर शिंदे  यांनी चांगली लढत दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  शिंदे यांच्यासाठी  सभा घेतली होती, पण त्याचाही फारसा परिणाम झाला नाही.   

स्थानिक उमेदवार नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांना ब्राम्हण महासंघाने विरोध केला होता. पण पुणेकरांनी  त्यांच्या पारड्यात मते टाकून विजयी केले आहे.  स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचाही रोष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात होता.  आम्हाला उमेदवार नको बाहेरचा, असे बोर्डही कोथरुडमध्ये लागले होते. पण भाजपच्या नेत्यांनी त्याची नाराजी दूर करत त्यांना प्रचारात सक्रीय करून घेतले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चंद्रकांत पाटलांना जनतेतून निवडून येण्याचे आव्हान दिले होते. अखेर पाटील यांनी जनतेतून निवडून येत पवारांसह विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात या मतदारसंघातील  माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.