जनतेची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी –  भाजपा

570

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – कथित राफेल डील घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी मोदी सरकारला क्लीनचीट दिली. कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत करताना भाजपाने सत्यमेव जयते म्हटले. तसेच देशातील जनतेची दिशाभूल करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

राफेल डील प्रकरणी चौकशीच्या फेरविचार याचिका फेटाळल्याबद्दल तसेच या प्रकरणाच्या चौकशीची गरज नसल्याचे सांगत मोदी सरकारला क्लीनचीट देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे राजनाथ सिंह यांनी स्वागत केले. तसेच एकामागून एक अनेक ट्विट करताना म्हटले, राफेलच्या निर्णय प्रक्रियेत आमच्या सरकारने पारदर्शकता बाळगल्याचे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. देशाच्या संरक्षण विषयी कधीही राजकारण होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच याप्रकरणी विरोधीप्रचार करणाऱ्या काँग्रेसवर टीका करताना देशातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच राफेलप्रकरणी मोदींविरोधात ‘चौकीदार चोर है’ ची घोषणा देखील चुकीची होती असेही ते म्हणाले.

दुसरीकडे रविशंकर प्रसाद म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने राफेल डील प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली त्यानंतर तिला योग्य ठरवले आहे. खरेदी प्रक्रियेची देखील तपासणी करीत ती देखील योग्य ठरवली आहे. तसेच ऑफसेट प्रक्रियाही योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीच्या निर्णयाचा हवाला देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर संबोधले होते. मात्र, हे सर्वांत मोठं खोटं होतं हे आता सुप्रीम कोर्टात सिद्ध झालं.

कोर्टाचा आजचा निर्णय हा सर्वसंमत्तीने घेण्यात आलेला होता. कोर्टाने याप्रकरणी राहुल गांधींनी मागितलेली माफी स्विकारली तसेच त्यांना अधिक सावधान रहायला सांगितले. सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा सांगितले की, राफेल लढाऊ विमानाच्या गुणांबाबत कोणतीही शंका नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टात हे हारले तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीत हा मुख्य मुद्दा बनवला. तसेच त्यांनी आमच्या लोकप्रिय आणि इमानदार नेत्याला कोर्टाने चोर म्हटल्याचे जनतेला खोटे सांगितले. परदेशातही भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागायला हवी अशी मागणी रविशंकर प्रसाद यांनी केली.