Maharashtra

जनता कोणाचीही मग्रुरी सहन करायला तयार नाही; शरद पवारांचा भाजपावर निशाणा

By PCB Author

December 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांमधील निकालात भाजपाला हादरा बसला असतानाच या निकालावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनता कोणाचीही मग्रुरी सहन करायला तयार नाही, हे निकालातून दिसते, अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी झाली असून या निवडणुकांमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु असून छत्तीसगडमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्येही भाजपा पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात होते. त्यामुळे या निकालांना महत्त्वप्राप्त झाले आहे.

शरद पवार यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, जनता मग्रुरी सहन करणार नाही हे या निकालावरुन दिसते. शरद पवार यांनी याद्वारे भाजपावर निशाणा साधला.

दरम्यान, दिल्लीत मंगळवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून संसदेबाहेर संजय राऊत यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. ‘निकालातून स्पष्ट संदेश मिळतोय’, असे त्यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना ‘कोणासाठी संदेश?’ असा प्रश्न विचारला. यावर ‘समझदार को इशारा काफी है. आत्मचिंतनाची गरज आहे’, असे त्यांनी सांगितले.