Maharashtra

जनताच पळपुटेपणा करणाऱ्यांचा समाचार घेईल; शरद पवारांचा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निशाणा

By PCB Author

September 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली. त्या पक्षात काही लोक सत्तेसाठी जात आहे. काही जण चुकीच्या वाटेवर जातील,  असे वाटले नव्हते, पण ते गेले. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार जनताच घेईल,  अशा  प्रहार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर केला.

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा आज ( रविवारी)  आयोजित करण्यात आला होता. यावेळी   पवार बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, मी विधानसभेत पहिल्यांदा १९६७ साली गेलो. त्यानंतर  ५२ वर्ष मी कोणत्या ना कोणत्या सदनात गेलो.  या कालावधीत  २७ वर्ष मी विरोधी पक्षात होतो. पण मला काम करताना अडचणी आल्या नाहीत. विरोधी पक्षात आपण असतो,  तेव्हा अधिक काम करून घेता येते, असे ते म्हणाले.

कोणी गेले, तरी चिंता करू नका. हे राज्य स्वाभिमानी लोकांचे राज्य आहे. लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. महाराष्ट्रात लोक मतदान करतील तेव्हा दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक घेऊन ज्यांनी तह केला आणि सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पळपुटेपणाची भूमिका घेत असतील, तर लोक समाचार घेतील, अशी टीका उदयनराजे यांचे नाव न घेता पवारांनी केली.