जगातील सर्वात मोठे धऱण फुटण्याच्या मार्गावर, चीन धास्तावला

0
4911

बिजिंग, दि. १७ (पीसीबी) : चीन मागच्या महिन्याभरापासून महापुराचं संकट झेलत आहे . मात्र चीन सरकारला भेडसावत असणारी सर्वात मोठी चिंता महापूर नव्हे, तर तो पूर निर्माण करणाऱ्या महाकाय धरणाची आहे. चीनच्या डझनभरापेक्षा जास्त राज्यांमध्ये पूर आला आहे. अनेक भागांमध्ये जमीन दिसणंसुद्धा दुरापास्त झालं आहे. जिथऊन कोरोना जगभर पसरला ते वुहान शहर, त्या शहरातली लॅब आणि सी फूड मार्केट सगळं पाण्यात गेलं आहे.

या सगळ्या महापुरात मोठा वाटा आहे, तो म्हणजे थ्री जॉर्ज डॅमचा. हे जगातलं सर्वात मोठं धरण आहे. काही दिवसांपूर्वी महापुरामुळे हे धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. चीननं त्या बातम्यांना खोटं ठरवत पाश्चिमात्य मीडियावर खापर फोडलं. मात्र आता चीनमधीलच काही पर्यावरणवादी या धरणाबाबत चिंता व्यक्त करु लागले आहेत. कारण, बांधकामानंतर पहिल्यांदाच या धरणातला जलसाठा सर्वाधिक पातळीवर गेला आहे. जर या धरणाला छोटासा जरी तडा गेला, तर चीनचे अनेक शहर एकाच वेळी पाण्याखाली जातील. वुहानपासून हे धरण 300 किलोमीटर लांब आहे. मात्र तरीसुद्धा याच धरणाचे काही दरवाजे उघडल्यामुळे वुहानमध्ये महापूर आला. यावरुन हे धरण चीनमध्ये हाहा:कार उडवू शकतं, याचा अंदाज बांधता येईल.

पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी करणारं हे धरण 2309 मीटर लांब आहे. त्यामुळे अजून काही दिवसपाऊस थांबला नाही, तर हे धरण किती काळ पाण्याचा दबाव सहन करेल, याबाबत स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे. त्याच भीतीपोटी मागच्या आठवड्यात या धरणाचे काही दरवाजे उघडले गेले. मात्र जितक्या पाण्याचा विसर्ग होतोय, तितकचं पाणी काही तासातच सतत सुरु असणारा पाऊस पुन्हा धरणात टाकत आहे.

धरणाचे आता अजून दरवाजे उघडले तर चीनच्या अनेक शहरांमध्ये पुराचं संकट येणार आहे. जर दरवाजे उघडले नाहीत, तर धरणाला धोका वाढण्याची चिन्हं आहेत. जगातलं सर्वात मोठं धरण म्हणून मिरवणाऱ्या चीनची अवस्था याच सध्या धरणामुळे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी झाली आहे.