जगातला सर्वात महागड्या घटस्फोटाला मंजुरी; बेजोस दाम्पत्य झाले विभक्त

0
591

न्यूयॉर्क, दि. ७ (पीसीबी) – अॅमेझॉन या जगातल्या अव्वल ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेजोस यांच्या घटस्फोटाला अखेर शुक्रवारी सिएटल येथील न्यायालयाने मंजुरी दिली आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, पोटगी म्हणून मॅकेन्झी बेझोस यांना ३८.३ अब्ज डॉलर (सुमारे २५ लाख कोटी रुपये) दिले जातील. परिणामी हा घटस्फोट जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.

गेली २५ वर्षे पती-पत्नी असलेले जेफ व मॅकेन्झी हे दाम्पत्य अखेर विभक्त झाले आहे, जानेवारी महिन्यातच त्यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली होती. जेफ व मॅकेन्झी यांनी मुलांच्या पालकत्वासंबंधी स्वतंत्र समझोता केला आहे. या घटस्फोटानंतर मॅकेन्झी या जगातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला ठरणार आहेत. ब्लूमबर्गच्या बिलिनयर्सच्या यादीत त्यांचं 22 वं स्थान असेल, अर्थात त्या जगातील २२ व्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरतील. संपत्तीचा इतका मोठा हिस्सा देऊन देखील जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून जेफ बेजोस कायम राहतील असा दावा देखील केला जात आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत संपत्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता आहे. मॅकेन्झी यांना ही संपत्ती कंपनीच्या शेअर्सच्या रुपामध्ये मिळेल अशी माहिती आहे. अ‍ॅमेझॉनचे चार टक्के भागभांडवल नावावर झाले तरी त्याचे कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांच्याकडे नाहीयेत. परिणामी कंपनीच्या कामकाजात त्यांना दखल देता येणार नाही, ते अधिकार जेफ बेझोस यांच्याकडेच कायम राहणार आहे. त्यामुळे त्यामुळे अ‍ॅमेझॉनचे नियंत्रक मालक ही जेफ यांची बिरुदावली कायम राहील. अ‍ॅमेझॉन कंपनीचे एकूण १६ टक्के भागभांडवल बेझोस दाम्पत्याकडे संयुक्तपणे होते. त्यापैकी ३८ अब्ज डॉलर एवढ्या प्रचलित मूल्याचे चार टक्के भागभांडवल घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांच्या एकटीच्या मालकीचे होईल. घटस्फोटानंतरही जेफ यांच्याकडे अ‍ॅमेझॉनचे १२ टक्के भागभांडवल कायम राहील. त्याचे सध्याचे मूल्य ११४.८ अब्ज डॉलर एवढे असेल.

घटस्फोटापोटी मिळणाऱ्या ३८ अब्ज डॉलरपैकी निम्म्या संपत्तीचा मॅकेन्झी या दानधर्म करणार असल्याची माहिती आहे. जगभरातील गर्भश्रीमंतांनी आपली जास्तीत जास्त संपत्ती दान करण्याचे आवाहन करणारा एक खुला वचननामा सन २०१० मध्ये अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट व मायक्रोसॉफ्टच संस्थापक बिल गेट्स यांनी जारी केला होता. त्यावेळी मॅकेन्झी बेझोस यांनी या वचननाम्यावर स्वाक्षरी करून आपली निम्मी संपत्ती दान करण्याचे जाहीर केले होते.