जकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले

2043

जकार्ता, दि. २९ (पीसीबी) – इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचे प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. उड्डाण केल्यानंतर १३ मिनिटानंतर विमानाशी संपर्क तुटला. शोध पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जावा समुद्र किनाऱ्याजवळ या विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. हे विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. परंतु, १३ मिनिटानंतर विमानाकडून कोणतीच सूचना न आल्याने एकच खळबळ उडाली. दुर्घटना घडल्याच्या शक्यतेने शोध आणि मदत अभियान सुरु करण्यात आले. विमानात क्रू मेंबरसह १८८ प्रवासी होते. अद्याप विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.

विमान कोसळल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने शोध आणि मदत पथकातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. तत्पूर्वी इंडोनेशियन प्रशासनाने लायन एअर जेटी ६१० बरोबर आमचा संपर्क तुटला असून विमानाबाबत काहीच माहिती समजू शकली नसल्याचे म्हटले होते. इंडोनेशियातील पेर्टीमिना ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अवशेष जावा समुद्रात दिसून येत आहेत. तर इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने कोसळलेल्या विमानात क्रू मेंबरसह १८८ प्रवासी होते, असे सांगितले आहे.

सोमवारी सकाळी ६.३३ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर प्रशासनाने डोंगर परिसरात शोध मोहीम सुरु केल्याचे वृत्त ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ने दिले होते. लायन एअरवेजचे प्रवक्ते डँनंग मंडेला प्रिहान्टो यांनी विमानाशी संपर्क तुटल्याचे सांगितले. विमानाचे लोकेशन अद्याप निश्चित झाले नसल्याचे ते म्हणाले होते.