Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशीच छिंदमसह ७० जणांवर एक दिवसाची शहरबंदी

By PCB Author

February 19, 2019

अहमदनगर, दि. १९ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमसह ७० जणांना आज (मंगळवार) छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशीच एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली.

श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह ७० जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ५०, कोतवाली पोलिसांनी १० आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी १० जणांवर ही कारवाई केली.

मागील वर्षी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमने एका कामाबाबत पीडब्लूडीचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवरायांविषयी अवमानकारक भाष्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला हद्दपार करण्यात आले होते. १६ फेब्रुवारीला श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली. छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. या पाश्वभुमीवर अहमदनगर शहर परिसरात पुन्हा कोणता वाद होऊ नये म्हणून छिंदमसह ७० जणांवर एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे.