Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमना ‘या’ गुन्ह्यात अटक; अडचणी वाढल्या

By PCB Author

September 15, 2021

अहमदनगर, दि.१५ (पीसीबी) : माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने पोलिसांनी आज अटक केली. दोन महिन्यांपूर्वी एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा त्यांच्याविरूद्ध दाखल झाला आहे. ही टपरी जेसीबीने उखडून टाकून ती जागा बळकावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. गुन्हा घडल्यापासून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात ते फरार होते. शेवटी रात्री तोफखाना पोलिसांनी त्यांना अटक केली. यासंबंधी तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ गुन्हा घडल्यापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते आढळून आले नाही. काल रात्री ते नगर शहरात आल्याची माहिती आम्हाला मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाच अटक केली असून त्यांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे.’

पूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम वादग्रस्त ठरले होते. या प्रकरणानंतर भाजपने त्यांना पक्षातून बाहेरचा रस दाखवला. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद गेले. ते दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर तेही पद रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. त्यानंतर पुढे जुलै २०२१ महिन्यात त्याच्याविरूद्ध हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचा भाऊ आणि तीस ते चाळीस जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे (वय ५२ रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जुलै रोजी दुपारी हे सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले. भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली. ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक करून नुकसान केले. श्रीपाद याने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक सुरू केली. धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आता या गुन्ह्यात दोघा छिंदम बंधुंना अटक झाली असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.