Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं, मग त्याचा अर्थ काय होतो ?

By PCB Author

November 20, 2022

– भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई दि. २० (पीसीबी) : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच प्रसारमाध्यमांतूनही राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना,’ असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या टिपण्णीनंतर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. ‘शिवाजी महाराजांची तुलना माफीवीर सावरकर यांच्याशी करून सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अवमान केला आहे. जोपर्यंत त्रिवेदी हे याप्रकरणी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा सहभाग असलेल्या कोणत्याही चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्ष सहभाग घेणार नाही,’ असं ट्वीट पवन खेरा यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानेही राजकीय वातावरण तापलं आहे. ‘महाराष्ट्रीय माणसांना विचारले की, तुमचा आदर्श कोण आहे, आजच्या युगात बोलायचे झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरी यांच्यापर्यंतची नावे समोर येतील. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील नायक आहेत’, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.