Maharashtra

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; सोनी वाहिनीने मागितली माफी

By PCB Author

November 08, 2019

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – बिग बी अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी आता सोनी टीव्हीकडून घडल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. सोनी वाहिनीने झालेली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

‘कौन बनेगा करोडपती-११’ च्या एका भागात प्रश्नाचे पर्याय सांगताना अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचे म्हणत शिवप्रेमींनी अमिताभ बच्चन यांना जाब विचारत त्यांच्यावर ताशेरे ओढले. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरायला लागली. हे प्रकरण अधिक चिघळण्याआधीच सोनी वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आला आहे. ‘केबीसीच्या कालच्या भागात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनवधानाने एक चूक झाली, ज्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आहे.’ असे म्हणत सोनी वाहिनीने जनतेची माफी मागितली आहे.

गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना प्रश्न विचारताना चॅनलकडून ही चूक झाली आणि एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला.

‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्यायही देण्यात आले.

अ. महाराणा प्रताप

ब. राणा सांगा

क. महाराजा रणजीत सिंह

ड. शिवाजी