Maharashtra

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

By PCB Author

July 15, 2023

कोल्हापूर – वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धमिर्यांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लॅण्ड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली.

‘‘ही मूळ जागा छत्रपती शाहू महाराज यांची असल्याने या प्रकरणी छत्रपती शाहू महाराज यांनी लक्ष घालावे अशी आमची विनंती आहे. वक्फ बोर्डाने ही सोसायटी ताब्यात घेण्यापेक्षा हा सर्व ट्रस्ट त्यांनीच ताब्यात घ्यावा, असे आम्हाला वाटते.’’

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘शाहू महाराजांनी सदर भूमी ही मुसलमानांसह अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचे साधन मिळावे, म्हणून दिली होती. ती केवळ मुसलमानांसाठी वा धार्मिक प्रयोजनासाठी दिलेली नव्हती. असे असतांना वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून त्यांची भूमी बळकावून मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. ‘‘महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यातही वक्फ बोर्डाने हिंदूंच्या जमिनी कह्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. अशाच प्रकारे तामिळनाडूतील एक संपूर्ण गाव आणि त्या गावातील 1500 वर्षांपूर्वीचे श्रीचंद्रशेखर स्वामींचे मंदिरही वक्फ बोर्डाने बळकावून ती ‘वक्फ बोर्डा’ची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. जो धर्मच मुळी 1400 वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आला, तो 1500 वर्षांपूर्वीच्या हिंदु मंदिराचा मालक कसा काय होऊ शकतो ? वक्फ कायद्यामुळे गुजरातमधील हिंदूंचे द्वारका बेट, सुरत महानगरपालिका, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील चंद्रशेखर आझाद पार्क, ज्ञानवापी, मथुरा आदी अनेक जागा वक्फची संपत्ती घोषित करण्याचा सपाटा चालू आहे. हे थांबायला हवे.’’