छत्रपतींचे वारस दिल्लीत जाऊन गमछा घालण्यातच धन्यता मानतात- शरद पवार

0
555

परभणी, दि. २० (पीसीबी) – छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही राज्य करतो, असे म्हणणारी माणसे ही फसवी आहेत. नाव शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि आपला धंदा सुरू करायचा, ही यांची नीती आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर  मिर्झाराजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी वाटाघाटी केल्या. दिल्लीला गेल्यानंतर मात्र या रयतेच्या राजाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर छत्रपती परतले आणि पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले त्यांनी परत मिळवले. पुन्हा रयतेचे राज्य स्थापन केले. याउलट त्यांच्याच कुटुंबातली माणसे दिल्लीत जाऊन गमछा घालून घेण्यात धन्यता मानतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता उदयनराजे भोसले यांच्यावर केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी पवार यांनी संवाद साधला. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री फौजिया खान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, राजेश विटेकर, प्रदीप सोळंके, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कठोर टीका केली. नाशिक ही कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बाजारात कोणी कांदा आणायचा नाही, असे सांगण्यात आले. काही कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या, अटक केली. पाकिस्तानातून कांदा आयात केल्याने इथल्या किमती पडल्या, त्यामुळे शेतकरी गाडीवर कांदे फेकतील याची भीती सरकारला होती. आपल्या विरोधात प्रतिक्रिया आली तर कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचे काम हे सरकार करते. ज्याच्या मनगटात धमक आहे आणि स्वाभिमान शिल्लक आहे, असा कोणताही माणूस हे सहन करणार नाही असेही पवार या वेळी म्हणाले.

सबंध देशात मंदीची लाट असून शेतमालाच्या किमती कोसळल्या आहेत. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत आणि नोकरभरतीची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी वेगळीच भरती सुरू केली, पण काही माणसे गेली तरी त्याची मला चिंता नाही. १९८० साली ५२ आमदार मला सोडून गेले, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही. आज काही लोक पक्ष सोडून जातानाही पवारसाहेब आमच्या हृदयात आहेत, असे बोलतात, तेव्हा बाबा तुझे हृदय आहे तरी केवढे? अख्खा शरद पवार त्यात मावतोय, असे पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला.