छत्तीसगडमधील शाळांना केंद्र सरकारने दिलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो

0
458

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या वतीने छत्तीसगडमधील सरकारी शाळांमध्ये देण्यात आलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो प्रिलोडेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अनेक सरकारी शाळांनी तक्रार केली आहे. हे टॅबलेट सुरु करताच आधी अश्लील फोटो दिसत असल्याचे शाळांनी म्हटले आहे.

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांच्या हजेरीचा तसेच दैनंदिन कामाचा तपशील ठेवण्यासाठी हे टॅबलेट देण्यात आले आहेत. मात्र, हे टॅबलेट सुरु केल्यानंतर अश्लील फोटो दिसत असल्याच्या अनेक शाळांनी  तक्रारी माझ्याकडे केल्या आहेत, असे छत्तीसगड क्षेत्राचे क्लस्टर रिसोर्स कॉर्डिनेटर गौरांग मिश्रा यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून शाळांना ऑफलाइन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यांत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने छत्तीसगडमधील सरकारी शाळांमध्ये या टॅबलेटचे वाटप केले आहे. शाळांमधील हजेरीमध्ये होणारा गोंधळ दूर करण्यासाठी या टॅबलेटचे वाटप करण्यात आलेले आहे. दैनंदिन कामाचा लेखाजोखा एकाच सर्व्हरवर जमा करता यावा, यासाठी हे टॅबलेट शाळांना देण्यात आलेले आहेत.