Desh

छत्तीसगडच्या प्रचार सभेत मोदिंचा काँग्रेसवर हल्लाबोल

By PCB Author

November 09, 2018

बस्तर, दि. ९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) छत्तीसगडमधील बस्तर जगदलपूर येथे प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत शहरी नक्षलवादावरुन त्यांना फटकारले. मोदी म्हणाले, ज्या मुलांच्या हातात पेन- पेन्सिल असायला हवी अशा मुलांच्या हातात काही राक्षसी वृत्तीचे लोक शस्त्रे देतात. त्यांच्या आई- वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त करतात. जे शहरी नक्षलवादी आहेत, त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, स्वत:देखील चांगले आयुष्य जगतात, एसी खोलीत बसतात. पण रिमोट कंट्रोलद्वारे ते आदिवासी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसनेही शहरी नक्षलावादावर उत्तर दिले पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई केल्यावर काँग्रेस त्यांच्या समर्थनासाठी मैदानात का उतरते?. अशा लोकांपासून रक्षण करण्यासाठी छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ बहरलाच पाहिजे, असे मोदींनी सांगितले. दूरदर्शनचा पत्रकार कॅमेरा घेऊन आला होता. या पत्रकाराची नक्षलींनी हत्या केली आणि अशा नक्षलींना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, ही कोणती विचारधारा आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला. अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बस्तरमध्ये येतो. छत्तीसगडचा विकास फक्त भाजपामुळेच झाला. आगामी काळात लोक रोजगाराच्या शोधात छत्तीसगडमध्ये येतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.