Maharashtra

छडी लागे छम छम…आता इतिहासजमा! शाळांत छडीची शिक्षा न देण्याचे शासनाचे आदेश

By PCB Author

July 08, 2018

धानोरा (जळगाव) – ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे बालगीत आता इतिहासजमा होणार  आहे. राज्यातील शाळांत आता विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा देता येणार नाही. शासनाने परिपत्रक काढून तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

शिक्षण बाल हक्क कायदा,२००९ च्या अनुच्छेद १७ नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, अशी तरतूद केली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने छडीची शिक्षा वगळण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करून शाळांत कार्यशाळा आयोजित कराव्यात, असे कळवले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनास देत त्याचा अहवाल संचालनालयास सादर करण्याचे म्हटले आहे. याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संचालनालयाचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी शनिवारी आदेश जारी केले.