Maharashtra

छगन भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही; संजय राऊतांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

By PCB Author

September 04, 2019

नाशिक,  दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावरून अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अखेर या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येवला येथे आज (बुधवार) पत्रकारांशी बोलताना पूर्णविराम दिला आहे.   

छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत खासदार  राऊत यांनी  भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही भाष्य केले. राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही, हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी   भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन राऊत यांनी दिले.  मी आहे तिथे बरा आहे, असे भुजबळांनी   म्हटले आहे. यावरून  त्यांच्या प्रवेशाबाबतचे  चित्र स्पष्ट झाले आहे, असेही  राऊत  म्हणाले.