Maharashtra

छगन भुजबळांच्या संरक्षणात वाढ करण्याची आमदार दीपिका चव्हाणांची मागणी

By PCB Author

November 20, 2018

नाशिक, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने   त्यांच्या पोलिस संरक्षणात वाढ करण्याची मागणी बागलाणच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे. 

छगन भुजबळ यांना समाजविघातक प्रवृत्तीकडून  ठार मारण्याच्या धमकीचे पत्र आली आहेत. भुजबळ हे देशातील बहुजन, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजाचे नेते आहेत.  महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून ते काम करत आले आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या जनसमुदायाचा प्रतिसाद मिळतो,  असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

भुजबळ हे विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांच्या संरक्षणात वाढ करण्याचे आदेश देण्यात यावेत. याबाबत सभागृहात स्थगन प्रस्ताव किंवा माहितीच्या मुद्द्याच्या माध्यमातून मांडणी करण्याची संधी मिळावी,’ अशी विनंती  चव्हाण यांनी या पत्रात केली आहे.