‘चौकीदार ही चोर है’ नावाचा क्राईम थ्रिलर सध्या सुरू आहे – राहुल गांधी  

0
675

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – ‘चौकीदार ही चोर है’ या नावाचा क्राइम थ्रिलर सध्या देशात सुरू आहे. अधिकारी थकले असून परस्परांवरचा विश्वास कमी झाला आहे. देशातील लोकशाही हुंदके देऊ लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. सीबीआयमधील वादाच्या प्रकरणात मोदी सरकारमधील मंत्र्यांवर सोमवारी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.   

सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यावर मोइन कुरेशी या मांस निर्यातदार व्यापाऱ्याकडून ३ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपास करणारे सीबीआय अधिकारी मनीषकुमार सिन्हा यांची तडकाफडकी हकालपट्टी  करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. या प्रकरणी तपास न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आणल्याचे स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी (दि. १९) सर्वोच्च न्यायालयात दिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेच तपासामध्ये आडकाठी आणत आहेत. केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी यांचाही यात सहभाग आहे. हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप सिन्हा यांनी न्यायालयात केला. कॅबिनेटचे सचिवही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत ‘दिल्लीत चौकीदार ही चोर है’ नावाचा क्राइम थ्रिलर सुरू असल्याची टीका केली आहे. सध्याच्या एपिसोडमध्ये सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने केंद्रीय मंत्री, सुरक्षा सचिव आणि कॅबिनेट सचिवांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. गुजरातचा एक साथीदार तर कोट्यवधींची वसुली करत आहे,’ असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.