चौकीदार साहेब रोज २० तास काम करत असल्याने देश उद्ध्वस्त होतोय – कन्हैयाकुमार

0
493

पाटणा, दि. १८ (पीसीबी) – बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणारे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. भारतीय टपाल खाते तोट्यात चालल्याचे वृत्त समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार केलेल्या टिकेमध्ये मोदींना खडेबोल सुनावले आहेत. मोदी रोज २० तास काम करतात म्हणूनच देश उद्ध्वस्त झाला आहे, अशी टिका कन्हैयाकुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खातेही आर्थिक संकटात सापडल्याचे कन्हैयाकुमार आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कन्हैयाकुमार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती बिकट झाली आहे. टपाल खात्याला १५ हजार कोटींचा तोटा झाला आहे. देश उगच नाही उद्ध्वस्त होत आहे. चौकीदार साहेब यासाठी रोज २० तास काम करत आहेत तेही कोणतीही सुट्टी न घेता.’

काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या वृत्तानुसार सरकारच्या मालिकेच्या इंडिया पोस्टला (भारतीय टपाल खाते) मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या तोट्याची आकडेवारी ही बीएसएनएल आणि एअर इंडियाच्या तोट्याच्या आकड्याहून अधिक आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात भारतीय टपाल खात्याला एकूण १५ हजार कोटींचा तोटा झाला आहे. मागील तीन वर्षांमध्ये भारतीय टपाल खात्याच्या होणाऱ्या तोट्याचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वाधिक तोट्यात असणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या यादीत टपाल खात्याने एअर इंडिया आणि बीएसएनएललाही मागे टाकले आहे. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

दरम्यान बेगुसराय मतदारसंघात भाजपचे उमेदवार अणि केंद्रीय गिरीराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैयाकुमार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भाजपने गिरीराज सिंग यांना मतदारसंघ बदलून बेगुसरायमध्ये पाठविल्याने ते सुरुवातीला नाराज होते. पण नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते लढण्यास तयार झाले. कन्हैयाकुमार हे रिंगणात असल्याने बेगुसराय मतदारसंघाकडे राष्ट्रीय पातळीवरील माध्यमे आणि राजकीय तज्ज्ञांचे लक्ष गेले आहे.