“चोर तो चोर वर शिरजोर”; भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळेंवर टिकास्त्र!

0
3851

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. शितोळे यांना ही मलई इतकी महागात पडली की महापालिका निवडणुकीत सांगवीतील मतदारांनी कायमचे घरी बसविले. मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी सांगवीतील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामांवरून भाजपला टार्गेट करणे म्हणजे “मी नाही त्यातली कडी लावा आतली”, अशी भूमिका घेण्याचा प्रकार असल्याचा घणाघात भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यावर केला आहे.

सांगवीतील रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामांवरून प्रशांत शितोळे यांनी भाजपवर केलेल्या टिकेला भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हर्षल ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सांगवीत पवना नदीच्या काठावर स्मशानभूमीचे काम सुरू आहे. या कामाला मागील पंचवार्षिकमध्येच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मंजुरी देण्यात आली. प्रशांत शितोळे यांनी पोसलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामाला मंजुरी देण्यासाठी त्यावेळी नगरसेवक असलेल्या शितोळे यांनी मलाई खाल्ली आहे, हे उघड गुपित आहे. सांगवी भागातील जनतेने २०१७च्या महापालिका निवडणुकीत शितोळे यांना कायमचे घरी बसवले. पराभवानंतर शितोळे यांनी स्मशानभूमीच्या कामात अनेक विघ्ने आणण्यास सुरूवात केली. स्मशानभूमीच्या जागेचा वाद उकरून काढत शितोळे यांनी मोबदला मिळावा म्हणून कामाला आडकाठी आणली.

स्मशानभूमीच्या जागेचाही मोबदला मागण्याची खालती पातळी शितोळे यांनी गाठली. या जागेच्या सात बारा उताऱ्यावर अनेक नागरिकांची नावे आहेत. त्यात शितोळे हे देखील नाव आहे. त्यामुळे आपणाला मोबदला मिळावी म्हणून शितोळे यांनीच स्मशानभूमीचे काम बंद पाडले. कामाचा ठेकेदार शितोळे यांनीच पोसलेला असल्यामुळे त्यानेही प्रशासनाकडे काम पूर्ण व्हावे यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. या कामाची मुदत संपून गेली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. स्मशानभूमीची जागा नदीपात्रातील असल्यामुळे त्याचा मोबदला देता येत नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.

तरीही प्रशांत शितोळे यांनी स्मशानभूमीच्या कामाची अडवणूक करून काम बंद पाडले आहे. आता हेच शितोळे भाजप नगरसेवकांच्या नावाने बोंब मारून सांगवी भागातील नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वास्तविक नगरसेवकपद न राहिल्यामुळे शितोळे यांची दुकानदारी कायमची बंद झाली आहे. ठेकेदारांना धमकावणे, ठेकेदारांच्या नावाने कामे घेऊन स्वतःच करणे, असे उद्योग करून नगरसेवक असताना शितोळे यांना अमाप माया गोळा करता आली. आता एक रुपयाही मिळत नसल्यामुळे सांगवीत कामे करणाऱ्या ठेकेदारांना दमबाजी करण्यासाठी चार-पाच गुंड पाळले आहेत. या गुंडांकरवी हप्ते गोळा करण्याचा शितोळे यांचा धंदा राजरोसपणे तेजीत सुरू आहे. एवढेच नाही तर शितोळे यांनी झोपडपट्टीतील गोरगरीब नागरिकांनाही सोडलेले नाही. मुळानगर झोपडपट्टीवासीयांना प्रत्येक कुटुंबामागे दोन-दोन हजार रुपये महिना हप्ता देण्याचा नुकताच दम भरण्यात आला आहे. हप्तेखोरीने त्रस्त झालेली सांगवीतील जनता शितोळे यांचा हा सुर्व कारनामा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

याच प्रशांत शितोळे यांनी सांगवीतील महिला बचत गटांनाही फसविले आहे. गोरगरीब महिलांनी बचत केलेले पैसे गोळा करून शितोळे यांनी सांगवीतील स्वतःच्या पेट्रोलपंपाच्या मंजुरीसाठी ते पैसे वापरले, हे उघड गुपित आहे. स्मशानभूमीचे कामही त्यांनी स्वतःच रखडवले आहे. त्याचे खापर भाजपवर फोडण्याचा शितोळे यांचा गनिमीकावा त्यांनाच महागात पडल्याशिवाय राहणार नाही. शहरातील स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधीं लाटण्याचा शितोळे यांचाच डाव होता. महापालिका निवडणुकीआधी इलेक्शन फंड गोळा करण्याच्या उद्देशाने गॅस शवदाहिनी खरेदीचा हा डाव भाजपनेच हाणून पाडला होता. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळेच शितोळे यांना निवडणुकीत सांगवीतील नागरिकांनी घरी बसविले. कदाचित हा पराभव अजूनही त्यांना सहन होत नसावा. त्यामुळेच सांगवीतील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामाचे भांडवल करून “मी नाही त्यातली कडी लावली आतली”, अशी भूमिका घेण्याचा प्रकार शितोळे करत आहेत. चोर तो चोर वर शिरजोरपणे वागणाऱ्या शितोळे यांचा सांगवीतील जनता पुढच्या निवडणुकीतही हिशोब चुकता करतील, अशी जोरदार टिका त्यांनी केली आहे.”