चोरीचा मोबाइल खरेदी करून दाऊदच्या नावाने महापौरांना धमकी

0
422

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या डोंगरी भागातून दाऊदच्या नावाने धमकी आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, ही धमकी डोंगरीतून नव्हे तर मुंब्य्रातून आल्याचे तपासात समोर आले असून ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चोरीचा मोबाइल विकत घेऊन त्याद्वारे त्याने ही धमकी दिली होती.

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी रात्री मोबाइलवरून धमकी आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने डोंगरीतून दाऊदचा माणूस बोलत असल्याचे सांगितले होते. ठाण्यात खूप भांडणे करता आणि व्यवस्थित राहत नाहीत. नीट राहिले नाहीतर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ अशी धमकी त्याने दिली होती. दाऊद तसेच अन्य टोळ्यांकडून खंडणीसाठी धमकीचे फोन येतात. मात्र, पहिल्यांदाच भांडणे करतात म्हणून दाऊद टोळीकडून फोन आल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही धमकी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी महापौर शिंदे यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी खंडणीविरोधी पथकाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने धमकी आलेल्या क्रमांकाच्या आधारे तपास करून वसीम सादीक मुल्ला (२८) याला अटक केली. तो मुंब्य्राचा रहिवासी असून त्याचा दाऊद तसेच अन्य टोळीशी काहीच संबंध नसल्याचे तपासात समोर आले.

वसीम याला अशा प्रकारे धमक्या देण्याची सवय असून त्याने यापूर्वी मुंब्रा पोलीस, नियंत्रण कक्ष, रुग्णालय आणि महापालिकेतील तीन ते चार नगरसेविकांना अशा प्रकारचा त्रास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंब्य्रातील एका घरामधून मोलकरणीने मोबाइल चोरला आणि हा मोबाइल वसीम याने पाचशे रुपयांमध्ये खरेदी केला. याच मोबाइलमधून त्याने महापौर शिंदे यांना धमकी दिली होती. धमकी दिल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून त्याने या मोबाइलचा वापर केला होता. त्याच्याकडे आयफोन-१० सुद्धा आहे. या फोनमध्ये चोरीच्या मोबाइलमधील सिम टाकले होते. त्याच आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली.