चुरशीच्या लढतीत ओडिशा-नॉर्थईस्ट बरोबरी

0
210

बांबोळी (गोवा), दि. 23 (पीसीबी):  हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात ओडिशा एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील चुरशीच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी झाली. दुसऱ्या सत्रात तीन मिनिटांच्या अंतराने हा निकाल लागला, ज्यात पेनल्टीचा समावेश होता. त्यामुळे बरोबरी होऊनही सामना चार गोलांमुळे रंगतदार ठरला. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. ओडिशाकडून आघाडी फळीतील ब्राझीलचा 29 वर्षीय दिएगो मॉरिसीओ आणि मध्य फळीतील दक्षिण आफ्रिकेचा 31 वर्षीय कोल अलेक्झांडर यांनी गोल केले. नॉर्थईस्टकडून बचाव फळीतील बेल्जियमचा 33 वर्षीय बेंजामीन लँबोट आणि आघाडी फळीतील घानाचा 30 वर्षीय क्वेसी अप्पीया यांनी गोल केले.

नॉर्थईस्टचे गुणतक्त्यातील चौथे स्थान कायम राहिले. आठ सामन्यांतून त्यांची पाचवी बरोबरी असून दोन विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण झाले. ओडिशाने तळातील 11व्या स्थानावरून एक क्रमांक वरचा गाठला. सात सामन्यांत त्यांची ही दुसरीच बरोबरी असून त्यांना पाच पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांचे दोन गुण झाले. एससी ईस्ट बंगालचेही दोन गुण आहेत. यात ओदिशाचा उणे 6 (5-11) गोलफरक ईस्ट बंगालच्या उणे 8 (3-11) पेक्षा सरस ठरला. ओदिशाची पहिल्या विजयाची प्रतिक्षा मात्र लांबली. मुंबई सिटी एफसी सात सामन्यांतून 16 गुणांसह सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचेही सात सामन्यांतून 16 गुण आहेत. यात मुंबईचा 8 (11-3) गोलफरक एटीकेएमबीच्या 5 (8-3) गोलफरकापेक्षा तीनने सरस आहे. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नाट्यमय परिस्थितीत गोल करत ओडिशाने खाते उघडले. मॉरिसीओने गोलक्षेत्राच्या आतबाहेर करीत चेंडू मारला. हा चेंडू नॉर्थईस्टचा मध्यरक्षक लालेंगमाविया याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला. त्याचवेळी ओडिशाच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला, तर लाईनमनने ऑफसाईडचा इशारा केला. रेफरी प्रतिक मोंडल यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून मॉरिसीओच्या नावावर गोल जमा केला. मग ओडिशाच्या खेळाडूंनी पुन्हा जल्लोष केला. ओडिशाने यंदा केलेला हा चौथाच गोल ठरला. पहिल्या सत्रात गोल करण्यात त्यांना प्रथमच यश आले. पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत नॉर्थईस्ट युनायटेडने बरोबरी साधली. त्यांचा बचावपटू आशुतोष मेहताने उजवीकडे फ्री किक मिळवली. त्याने बेंजामीनच्या दिशेने अप्रतिम क्रॉस शॉट मारला. त्यानंतर बेंजामीनने व्यवस्थित संतुलन साधत हेडिंगवर लक्ष्य साधले. त्यावेळी ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगला काहीही संधी मिळू शकली नाही. नॉर्थईस्टने दुसऱ्या सत्रात आघाडी घेतली. उत्तरार्धात 65व्या मिनिटाला स्ट्रायकर लुईस मॅचादोने डावीकडून मुसंडी मारत सहकारी स्ट्रायकर क्वेसी अप्पीया याला अफलातून पास दिला. त्याचवेळी ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग पुढे सरसावला. त्याने चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी मैदानावर घसरत प्रयत्न केला, पण त्यामुळे अप्पीया यालाही पाडण्यास तो कारणीभूत ठरला. परिणामी रेफरी प्रतिक मोंडल यांनी नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल केली. त्यावर अप्पीयाने डाव्या बाजूने फटका मारला. अर्शदीपने दिशेचा अंदाज बरोबर घेतला, पण वेगवान फटका रोखण्यात त्याला अपयश आले.

ओडिशाने सांघिक प्रयत्नांच्या जोरावर प्रतिाक्रमण रचले. आघाडी फळीतील दिएगो मॉरिसीओने मध्य फळीतील जेरी माहमिंगथांगा याला पास दिला. त्यातून मध्य फळीतील कोल अलेक्झांडरला चेंडू मिळाला. अलेक्झांडरने मग नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारताना नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत याला संधी दिली नाही. सामन्यातील पहिला कॉर्नर पाचव्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडला मिळाला. आघाडी फळीतील पी. एम. ब्रिटो याने गोलक्षेत्रात उजवीकडे चेंडू मारला, पण ओडिशाचा बचावपटू गौरव बोरा याने तो बाहेर घालवला. त्यामुळे आणखी एक कॉर्नर देण्यात आला. आघाडी फळीतील लुईस मॅचादो याने गोलक्षेत्रात मारलेल्या या चेंडूवर गुरजिंदर कुमारने प्रयत्न केला, पण ओडिशाच्या विनीत रायने तो फोल ठरवला.