चीन ला किंमत मोजावी लागेल – डोनाल्ड ट्रम्प

0
396

वॉशिंग्टन, दि. ८ (पीसीबी) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी कोरोना महामारीला चीनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, चीन जगासोबत ज्या प्रकारे वागला आहे, त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून ते अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. परंतु, अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा परतले आहेत. दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओत म्हटले आहे की, मला झालेला कोरोना म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद आहे, कारण त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं आहे. या रोगावरील उपचारासाठीच्या संभाव्य औषधांबाबत मला शिकायला मिळालं.

आतापर्यंत संपूर्ण जगाला कोरोनाचा फटका बसला आहे. साडेतीन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. कोरोनामुळे जगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून तिथे कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
ट्रम्प अमेरिकन नागरिकांना म्हणाले की, कोरोना महामारीला आपल्यापैकी कोणीही जबाबदार नाही. कोरोनाला केवळ चीनच जबाबदार आहे. चीनमुळेच जगाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्यामुळेच जगाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. मात्र, चीनलादेखील याची किंमत चुकवावी लागेल. असे म्हणत त्यांनी देशातील नागरिकंना धीर देण्याचा प्रयत्न केला.