चीन राष्ट्राध्यक्षांना उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महारांजांनी दिली ही अनमोल गिफ्ट

0
223

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी मंगळवारी रामायण या प्राचीन ग्रंथाची एक प्रत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पाठवली. तसंच रावणाच्या विस्तारवादी विचारसरणीमुळे झालेल्या नुकसानीवरून त्यांना धडा घेण्याचा सल्लाही सतपाल महाराज यांनी जिनपिंग यांना दिला. “चीनच्या सैनिकांनी ज्याप्रकारे गलवान खोऱ्यात आपल्या विस्तारवादी विचारणीमुळे भारतीय जवानांवर हल्ला केला तो प्रकार अतिशय निषेधार्ह आहे,” असंही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं. तसंच भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या २० सैनिकांना ठार केलं होतं.

रावणाच्या विस्तारवादी विचारसरणीमुळे त्याचा कोणता परिणाम झाला हा संदेश चीनच्या राष्ट्रध्यक्षांपर्यंत पोहोचवायचा असल्यानं त्यांना रामायण हा ग्रंथ पाठवल्याचं सतपाल महाराज यांनी सांगितलं. विस्तारवादी व्यक्ती किंवा विस्तारवादी देशाची कधीही भरभराट होत नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष रामायणातून काही बोध घेऊन बदल करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“जी व्यक्ती विस्तारवादी विचारसणीचा अवलंब करते त्याचा अंत कसा होतो हे रामायणातून सांगण्यात आलं आहे. सध्या चीनचं सरकार जनतेचा मोठ्या प्रमाणात पैसा हा सैन्याची ताकद वाढवण्यावर खर्च करत आहे. तो त्यांनी ज्या आजारानं आज संपूर्ण जग त्रस्त आहे असा आजार थांबवण्यासाठी खर्च करावा,” असंही सतपाल महाराज म्हणाले. भारतानं बांगलादेश जिंकूनही त्यावरील दावा सोडला होता. परंतु सुरूवातीपासूनच चीनची विस्तारवादी भूमिका राहिली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या आक्रमक संघर्षानंतर सर्वच स्तरातून चीनचा निषेध करण्यात आला होता. तसंच अनेक देशांनीही चीनच्या विस्तारवादी भूमिकेला विरोध केला होता.