चीन आणि भारतीय लष्कर पुन्हा एकदा आमने-सामने

0
383

नवी दिल्ली, दि.27 (पीसीबी) : लडाखमध्ये सीमा वादावरुन भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. नियंत्रण रेषेवर चीन आणि भारतीय लष्कर पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहिले आहेत. चीनने भलेही सीमारेषेवर सैनिकांची संख्या वाढवली असली तरी भारतानेही आपण मागे राहणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आणि भारतासह इतर अनेक देशांमधील तणावादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांबरोबर सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान सीमारेषेवरील ताज्या स्थितीची आणि भारताच्या सैन्य तयारीवर महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पडद्याआड परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, भारताने कोणत्याही परिस्थिती मागे पाऊल टाकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशांमध्ये मागील 20 दिवसांपासून चाललेल्या हालचाली पाहता भारतीय सैन्याने उत्तर सिक्किम, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील संवेदनशील सीमावर्ती भागातील आपली उपस्थिती वाढवली असून भारत चीनच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना उत्तर देण्यास सक्षम असल्याचा संदेश दिला आहे
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय क्षेत्रात कोणत्याही प्रकारची चीनची घुसखोरी आणि स्थिती परिवर्तनाचा प्रयत्न अयशस्वी ठरवण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे. मजबुती आणि संयमाबरोबरच चिनी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतानेही आपल्या जवानांची संख्या वाढवली आहे.

दरम्यान, लडाखच्या पूर्व भागात चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती नाजूक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे असलेल्या तणावपूर्ण स्थितीच्या वातावरणात पीएलएच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) सैनिकांनी गालवान भागातल्या भारतीय क्षेत्रात जवळपास 10 किलोमीटर आत घुसून आपले तंबू ठोकले आहेत.